श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर तीन दुचाकींचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

श्रीरामपूर,(प्रतिनिधी):- देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर घडली. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एस. कॉर्नरजवळ तीन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात स्वाती सोमनाथ जाधव (वय १७, रा. नाशिक) आणि गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय १८, रा. श्रीरामपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून नेवाशाच्या दिशेने देवदर्शनासाठी दोन दुचाकी जात होत्या. त्याचवेळी नेवाशाकडून श्रीरामपूरच्या दिशेने एक दुचाकी येत होती. एस. कॉर्नरजवळ या तिन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही दुचाकींच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात स्वाती जाधव आणि गणेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ऋषिकेश रवींद्र गोडे, श्रावणी संतोष निकम आणि ओम प्रवीण परदेशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर विशाल शंकर गुंजाळ आणि यश समाधान पडघन हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या प्रवासाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामुळे श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!