संगमनेर, प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात आशा संतोष निठवे (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे डिग्रस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आशा निठवे या कांद्याच्या पिकातील रोपांची निंदणी करण्यासाठी शेताकडे जात होत्या. यावेळी कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात घबराट उडाली. मात्र, महिलेने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
या हल्ल्यात आशा निठवे यांच्या चेहऱ्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, डिग्रस परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.
डिग्रस परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा दिवसाढवळ्या महिलेवर हल्ला झाल्याने शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीची कामे करण्यासाठी महिला आणि पुरुषांना दररोज शेतात जावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात नियमित गस्त घालणे, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे आणि संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावर करणेही कठीण होत असल्याची भावना सरपंच अशोक खेमनर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.









