सत्यजित तांबे यांच्या निधीतून सभामंडपाचे लोकार्पण; थोरातांची दुष्काळमुक्तीसाठी प्रार्थना

संगमनेर,(प्रतिनिधी):- सत्यजित तांबे यांच्या निधीतून तुळजाई माता मंदिराच्या सभामंडपासाठी देण्यात आलेल्या २० लाख रुपये निधीतून तसेच जोरवे येथील उद्योजक आणि सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के. के. थोरात यांनी आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ दिलेल्या २० लाख रुपयांच्या मदतीतून कोकणगाव येथे उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे आणि मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जगदंबा मातेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करावे, अशी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

कोकणगाव येथील तुळजाई माता मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के. के. थोरात, शरद नाना थोरात, सरपंच आशाताई जोंधळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिर परिसराच्या विकासासाठी के. के. थोरात यांनी स्वर्गीय सीताबाई गणपत थोरात, स्वर्गीय सावित्रीबाई केशव थोरात आणि स्वर्गीय हरणाबाई रंगनाथ थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ आर्थिक मदत केली. त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांनी सभामंडप आणि मंदिर परिसराच्या विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या दोन्ही योगदानातून साकारलेल्या विकासकामांचे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असूनही तालुक्यातील विविध विकासकामे सातत्याने मार्गी लागली आहेत. ग्रामीण विकास, सहकार, शिक्षण आणि सातत्यपूर्ण लोकाभिमुख कामांमुळे संगमनेर तालुक्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कोकणगाव येथील निजरणेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठीही निधी देण्यात आला असून, हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. त्याच धर्तीवर तुळजाई माता मंदिर परिसराचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी मंदिर परिसराची स्वच्छता आणि देखभाल सातत्याने करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावर्षी राज्यात दुष्काळाचे मोठे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जगदंबा मातेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर करावे आणि शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याची विकसित तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे. गावोगावी विविध विकासकामे आणि योजना राबविण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळांच्या विकासासाठीही सातत्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्यात महादेवाची अनेक मंदिरे असून, जगदंबा मातेच्या मंदिरांचाही विकास होत आहे. मंदिरे ही केवळ श्रद्धेची ठिकाणे नसून मनःशांती मिळविण्याची महत्त्वाची केंद्रे आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी साधुसंत, महंत आणि समाजसुधारकांनी मानवता व समानतेचा संदेश दिल्याचे सांगितले. मानवता हाच मोठा धर्म असून, हा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

के. के. थोरात म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा आपण कायम ठेवली आहे. समाजासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब थोरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी तुळजाई मातेचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्यात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली. या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!