खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटील यांची टीका

लोणी,(प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आले असून, राजकारणातील सभ्यता आणि संकेतांचे उल्लंघन करणारे आहे, अशी टीका जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेसला विविध स्तरांवर मिळत असलेले अपयश आणि जनतेने दिलेला पराभवाचा कौल पक्षाला स्वीकारता येत नसल्याने अशी वक्तव्ये केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी खरगे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. राजकारणामध्ये मतभेद असले तरी काही सभ्यता आणि संकेत पाळणे आवश्यक असते. मात्र, खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य होणे दुर्दैवी आहे. राजकीय विरोधाच्या नावाखाली खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे ही काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसला देशातील जनतेने वेळोवेळी निवडणुकांमधून पराभवाचा कौल दिला आहे. मात्र, हा पराभव पक्षाला अजूनही स्वीकारता आलेला नाही. विविध मुद्द्यांवर आंदोलने करून तसेच अन्य मार्गांचा अवलंब करूनही जनतेचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पक्षाकडून वैफल्यग्रस्त मानसिकतेतून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

देशाच्या पंतप्रधानांच्या कुटुंबीयांबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे जनतेला मान्य होणार नाही. राजकारणातील सभ्यता आणि संकेत मोडणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कर्जत ऊर्जा प्रकल्पाबाबत राजकीय भाष्य टाळावे

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी प्रकल्पाचा मूळ विषय समजून न घेता राजकीय भाष्य करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.

या आधुनिक ऊर्जा प्रकल्पामुळे राज्याच्या वीजविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच, प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण होणार नसल्याचे सांगताना नियोजित क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट वृक्षारोपण करून निसर्गसंवर्धनाला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चारा टंचाईवर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा पर्याय

अहिल्यानगर जिल्ह्यातील चारा टंचाई आणि पशुधनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन प्रशासकीय स्तरावर करण्यात आले आहे. चाऱ्याच्या वाहतुकीवर जिल्हाबंदी लागू केल्यामुळे काही भागांत अडचणी निर्माण होत असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली जाईल.

चारा उपलब्धतेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनामध्ये समन्वय साधून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कमी पाणी आणि कमी जागेत पौष्टिक चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशुधनासाठी चारा निर्मिती करण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे.

यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा टंचाई निधीतून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध पर्यायांचा विचार केला जात असून, चारा टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!