लोणी,(प्रतिनिधी):- लोणी खुर्द येथील लोणी-निर्मळ-पिंपरी रस्त्यालगत असलेल्या संजय सोपान आहेर यांच्या वस्तीवर मध्यरात्री बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. दहा फूट उंच गेटवरून उडी मारून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि तेथे असलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेत कुत्रा जखमी झाला. त्यानंतर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गाईवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास संजय आहेर यांच्या वस्तीवर बिबट्या आला. वस्तीवरील सुमारे दहा फूट उंच असलेल्या गेटवरून झेप घेत त्याने गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यात असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला.त्यानंतर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाईने मोठ्याने ओरडल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने गाईवरील संभाव्य हल्ला टळला.
या घटनेमुळे लोणी खुर्द परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांसह पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन संबंधित परिसरात पाहणी करावी आणि बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









