सात्रळ-तांभेरे रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात; दहावीची विद्यार्थिनी जखमी

झरेकाठी, प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- राहुरी तालुक्यातील सात्रळ-तांभेरे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्याने शाळेत जात असताना खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ येथील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी मानसी प्रदीप शिंदे ही जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मानसी शिंदे ही तांभेरे येथून सात्रळच्या दिशेने शाळेत जात असताना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने तिचा अपघात झाला. या अपघातात ती जखमी झाली. मात्र, ही घटना केवळ एक अपघात नसून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येचे उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सात्रळ-तांभेरे रस्त्यावर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या पृष्ठभागामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सात्रळ पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी आणि मागण्या केल्या आहेत. मात्र, अद्यापही या समस्येवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, सात्रळ-तांभेरे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात आली नाही, तर परिसरातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!