लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील गोगलगाव परिसरातील लोणी-तळेगाव रोडवर स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी-तळेगाव रोडवरील गोगलगाव परिसरात स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की, दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच स्विफ्ट कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश धादवड आणि पोलीस नाईक सचिन कोळेकर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
दरम्यान, मृत दुचाकीस्वाराची अद्याप ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या अपघाताबाबत लोणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.








