चौंडी, शिर्डी, शनिशिंगणापूरच्या विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नगरी समाचार (प्रतिनिधी):- चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकासकामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती तसेच आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

      चौंडीतील स्मृतीस्थळांच्या विकासाला प्राधान्य

   चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विविध कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचीही माहिती त्यांनी घेतली.स्मृतीस्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक नियोजन करून संबंधित कामांना गती देण्याच्या सूचना डॉ. आशिया यांनी दिल्या. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.प्रस्तावित विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाच्या दृष्टीनेही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये नियोजन

  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.भाविकांची वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करून संबंधित विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डी आणि शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक पार्किंगची जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

घोडेगाव एमआयडीसी परिसरातील पार्किंगची क्षमता तपासणार

   घोडेगाव एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी किती जमीन उपलब्ध होऊ शकते, तसेच उपलब्ध जागेत किती वाहनांची पार्किंग क्षमता निर्माण करता येईल, याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.यामुळे कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी आणि शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

शिर्डीतील प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना

   शिर्डी नगरपरिषद हद्दीतील शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या इतर विकासकामांचीही पाहणी करून त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक, पार्किंग, रस्ते आणि नागरी सुविधांचे प्रभावी नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!