नगरी समाचार (प्रतिनिधी):- आपापसातील वाद व न्यायालयीन प्रकरणे परस्पर समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी भ. कचरे यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय बँक तसेच वीज वितरण कंपनीची दाखलपूर्व प्रकरणे देखील लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणांचाही लोकअदालतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोर्ट फी परत मिळण्याची सुविधा
लोकअदालतीमध्ये परस्पर समझोत्याने प्रकरण निकाली काढल्यास संबंधित पक्षकारांना भरलेली कोर्ट फी परत मिळते. त्यामुळे न्यायालयीन वाद दीर्घकाळ चालण्यापेक्षा लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोडीने प्रकरण निकाली काढण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ज्या नागरिकांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवायची आहेत, त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहिल्यानगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकार आपल्या संबंधित वकिलांशीही संपर्क साधू शकतात.
लोकअदालतीसाठी प्रकरण नोंदविण्यासाठी ८५९१९०३६१६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच dlsanagar@gmail.com या ई-मेलवरही संपर्क करता येणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी भ. कचरे आणि सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.









