प्रवरा नगरीत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा; विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रवरा नगरीत स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा

नगरी समाचार (प्रतिनिधी):- हातात तिरंगा, ढोल-लेझीमचा गजर, वारकरी परंपरेचा जागर आणि मनात राष्ट्रप्रेम अशा उत्साहपूर्ण वातावरणात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूहाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि पाच हजारांहून अधिक पालक, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी संस्थेच्या एनसीसी पथकाने ध्वजाला मानवंदना दिली.

‘आपली माती, आपली संस्कृती, आपले युवक आणि आपला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अखंड भारताची प्रतिकृती, तिरंगा, ढोल-लेझीम आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. पांडुरंगाची महती सांगणाऱ्या रिंगण सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. हजारो विद्यार्थ्यांनी एकजुटीने सादर केलेल्या या उपक्रमातून भक्ती, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

यावेळी बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रवरेच्या मातीतून राष्ट्रासाठी योगदान देणारी सक्षम, संस्कारक्षम आणि जबाबदार युवा पिढी घडत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पर्धा परीक्षा, पोलीस व आर्मी भरती प्रशिक्षणातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.

भारतीय संस्कृती, परंपरा, देशभक्ती आणि युवा शक्तीचा प्रभावी आविष्कार घडविणारा हा सोहळा प्रवरा नगरीसाठी अविस्मरणीय ठरला. ‘आपल्या मुळांचा अभिमान, संस्कृतीची ओळख आणि युवा शक्तीच्या बळावर सक्षम भारत’ हा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!