यल्लापूरच्या अर्बैल घाटात केलवडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

यल्लापूर अर्बैल घाट आकाश रजपूत खून

नगरी समाचार,प्रतिनिधी(सोमनाथ डोळे):- राहाता तालुक्यातील केलवड येथील २३ वर्षीय आकाश दशरथ रजपूत या तरुणाचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील मोलेपाल-अर्बैल घाट परिसरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश हा केलवड गावातील एका ट्रकवर मदतनीस चालक म्हणून दुसऱ्या चालकासोबत कामानिमित्त गेला होता. त्याचा मृतदेह गंभीर स्वरूपाच्या जखमांसह आढळून आल्याने हा खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी यल्लापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३ आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अर्बैल घाट परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. तक्रारदार रवी कृष्ण सिद्दी, रा. कोडलागड्डे यांच्या तक्रारीवरून यल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजशेखर वंदाली यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मयत तरुणाची ओळख आकाश दशरथ रजपूत, रा. केलवड, ता. राहता अशी पटली आहे. आकाश हा रोजगाराच्या निमित्ताने ट्रकसोबत गेला होता. प्रवासादरम्यान त्याचा मृतदेह अर्बैल घाट परिसरात गंभीर जखमांच्या अवस्थेत आढळून आल्याने राहता तालुक्यात खळबळ उडाली आहे.

       पत्नीची सखोल चौकशीची मागणी

मयत आकाश यांची पत्नी मनीषा आकाश रजपूत यांनी या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी राहता तहसीलदारांना लेखी निवेदन दिले.मनीषा रजपूत यांनी निवेदनात, आपल्या पतीचा बाहेरील राज्यात संशयास्पद मृत्यू झाला असून हा खून असल्याचा संशय असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.तसेच मयताचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरिब असल्याने शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

     रस्ता रोको आंदोलन; प्रशासनाची मध्यस्थी

या घटनेनंतर मयताच्या कुटुंबीयांसह केलवड येथील नागरिकांनी न्यायासाठी आवाज उठवत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस कर्मचारी संदीप उंदावत तसेच पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.

स्थानिक नेते आणि प्रशासनाने मध्यस्थी करत या प्रकरणाचा पाठपुरावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्याचे आश्वासन दिले. तसेच तहसीलदारांच्या माध्यमातून मयताच्या कुटुंबाला शक्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

१५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात १५ दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, तसेच लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी दिला आहे.दरम्यान, ट्रकसोबत गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यल्लापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आकाशच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.मयताच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे मनीषा रजपूत यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!