पिंप्री लौकी मोकाट कुत्र्यांचा मेंढ्यांवर हल्ला

पिंप्री लौकीत मोकाट कुत्र्यांचा हल्ला; ५ मेंढ्या ठार

प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी गाव परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकरी व मेंढपाळ पोपटराव दातीर यांच्या मेंढ्यांच्या कळपावर दिवसाढवळ्या हल्ला करून पाच मेंढ्या ठार केल्या आहेत. तर चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गाव व परिसरात १० ते १५ मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होत असून, यापूर्वीही कोंबड्या, बकऱ्या तसेच इतर जनावरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे गावात बिबट्याची दहशत असतानाच मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मोकाट कुत्र्यांचा वावर शाळकरी मुलांसाठीही धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे कुत्रे हल्ला करू शकतात, अशी चिंता पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुले, महिला, शेतकरी आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते भारतराव पाटील गीते यांनी पशुसंवर्धन विभाग तसेच वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ग्रामस्थांनीही सतर्क राहून लहान मुले व पाळीव जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रानडुकरांचाही सुळसुळाट; उभी पिके जमीनदोस्त

दरम्यान, पिंप्री लौकी परिसरात रानडुकरांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून, गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पोनाडी रोड ते दरा परिसर तसेच पिंपरी फाटा आणि गीते वस्ती भागात रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून ऊस व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रानडुकरांचे कळप रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून काही तासांतच मोठ्या क्षेत्रातील उभे पीक जमीनदोस्त करतात. एका रात्रीत जवळपास एक एकर क्षेत्राचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभागाकडे अनेक वेळा विनंती करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पावसाची अनिश्चितता, वाढती महागाई, शेतीकामासाठी मजुरांची कमतरता आणि उत्पादन खर्चाचा वाढता भार यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. त्यात उभ्या पिकांचे रानडुकरांकडून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

मोकाट कुत्रे आणि रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच सौ. संगीता गीते व उपसरपंच बाजीराव गीते यांनी पत्राद्वारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.प्रशासनाने या दोन्ही समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!