नगरी समाचार, (प्रतिनिधी):- बाभळेश्वर ग्रामपंचायत कार्यालयासमोर संशयास्पदरीत्या दुचाकींची चार इंजिने बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध लोणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८ हजार रुपये किमतीची चार जुनी वापरातील मोटारसायकल इंजिने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी रफिक लतिफ पिंजारी (वय ४०, रा. नवी दिल्ली, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर ग्रामपंचायत कार्यालयासमोर रफिक पिंजारी हा दुचाकींची चार इंजिने संशयास्पदरीत्या स्वतःजवळ बाळगून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे या इंजिनांबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक व खात्रीशीर माहिती दिली नाही.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी हिरोहोंडा कंपनीचे इंजिन क्रमांक PM4197CMGBG, कावासाकी कंपनीचे इंजिन क्रमांक DDMBHH63580, DHC नावाचे इंजिन क्रमांक DUMCML57576 आणि होंडा कंपनीचे इंजिन क्रमांक GC36E77536595 अशी चार इंजिने जप्त केली. या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या मुद्देमालाची OKEN स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र दत्तात्रय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२२/२०२६ दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१४९४ अवीनाश मकासरे करत आहे.









