सात फूट कंपाऊंड ओलांडून बिबट्याची झेप

कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर पशुधनाची शिकार

नगरी समाचार, (प्रतिनिधी):- कोल्हार–राजुरी रस्त्यावरील रानशेंडा परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांच्या काळजात धडकी भरली आहे. तब्बल सात फूट उंच कंपाऊंड ओलांडून थेट वस्तीमध्ये प्रवेश करीत बिबट्याने कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत पशुधनावर झडप घातली आणि ते जबड्यात पकडून सात फूट उंच कंपाऊंडवरून उडी मारत पसार झाला.

सदर थरारक घटना रानशेंडा परिसरात रोहित (गुल्या) रवींद्र खर्डे यांच्या वस्तीवर घडली. काल सायंकाळी सातच्या सुमारास रोहित खर्डे हे कुटुंबीयांसह घरात असताना पशुधनाचा अचानक आवाज ऐकू आला. त्यामुळे कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या थेट पशुधनावर हल्ला करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही क्षणांतच बिबट्याने पशुधन जबड्यात पकडले आणि सात फूट उंच कंपाऊंड ओलांडून ते घेऊन गेला. डोळ्यांसमोर घडलेला हा थरार पाहून खर्डे कुटुंबीयांची अक्षरशः पाचावर धारण बसली.

विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी घराचे दरवाजे उघडे होते आणि कुटुंबीय घराजवळच चर्चा करीत होते. अशा परिस्थितीत बिबट्याने कोणतीही भीडभाड न बाळगता थेट वस्तीमध्ये प्रवेश करून पशुधनावर हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

घटनेपूर्वी दुपारच्या सुमारासही खर्डे यांच्या शेत परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर रात्री त्याने थेट वस्तीमध्ये येऊन पशुधनाची शिकार केल्याने बिबट्याचा परिसरात मुक्त संचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रानशेंडा परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वनविभागाकडून बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याच्या कारवाया केल्या जातात. मात्र पिंजरे लावल्यानंतरही त्याच परिसरात पुन्हा बिबट्यांचा वावर कसा वाढतो, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बिबट्याची वाढती दहशत लक्षात घेता वनविभागाने केवळ कारवाईपुरते न थांबता या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, तसेच बिबट्याचा माग काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बिबट्याने सात फूट उंच कंपाऊंड सहज ओलांडून थेट घराजवळ प्रवेश केल्याने आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पशुधनानंतर बिबट्या मानवी वस्तीकडे वळण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली असून शेत वस्ती वर राहणाऱ्या बळीराजाच्या सह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!