दाढ बु. येथे गाढवांच्या साहाय्याने वाळू वाहतूक

६ गाढवांसह ६१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील प्रवरा नदीपात्रातून गाढवांच्या साहाय्याने वाळू उपसा करून विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एका व्यक्तीस ताब्यात घेत सहा गाढवांसह सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळी लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे यांना गुप्त बातमीदारामार्फत दाढ बु. येथे प्रवरा नदीपात्रात गाढवांच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिस पथक सकाळी सुमारे १०.२० वाजता दाढ बु. येथील प्रवरा नदीपात्रात पोहोचले. त्यावेळी एक व्यक्ती गाढवांच्या साहाय्याने नदीतील वाळू वाहतूक करताना आढळला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव विलास वसंत शिंदे (वय ३३, रा. दाढ बु., ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवाना आहे का? अशी विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने परवाना नसल्याचे सांगितल्याचे सांगीतले.पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत गाढवांची पाहणी केली. यावेळी सहा गाढवांच्या पाठीवरील पोत्यांमध्ये अंदाजे ०.२५ ब्रास वाळू, किंमत सुमारे १ हजार ५०० रुपये, आढळून आली. तसेच सहा गाढवांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रतिभा थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास वसंत शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलिस करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!