लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर लोणी पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भारत गॅस एजन्सीसमोर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा हायवा आणि त्यामध्ये भरलेली सुमारे साडेचार ब्रास वाळू, असा एकूण २५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सुदेश सुभाष गिरे (वय ३०, रा. राजणगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र दत्तात्रय माळी यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शासनाची आवश्यक परवानगी नसताना गौण खनिज असलेल्या वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत MH-15 HH-5265 क्रमांकाचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा टाटा हायवा, अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा, तसेच त्यामध्ये भरलेली अंदाजे २६ हजार रुपये किमतीची साडेचार ब्रास वाळू जप्त केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार साईनाथ राशिनकर करीत आहेत. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









