कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण संपन्न

कोल्हार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात आणि शिवभक्तांच्या जल्लोषात संपन्न झाला. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी कोल्हार-भगवतीपूर परिसरात शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. हजारो शिवप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी झालेल्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, स्वाभिमान, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहेत. त्यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यामुळे कोल्हारच्या वैभवात भर पडली असून, भावी पिढ्यांना स्वराज्याचा इतिहास आणि महाराजांचे प्रेरणादायी कार्य यांची आठवण करून देणारे हे स्मारक ठरणार आहे.

कोल्हार परिसरातील शिवप्रेमींसाठी हा सोहळा अभिमानाचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण ठरला. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते.

error: Content is protected !!