जामखेडच्या अरणगावात पिकांची पाहणी; राधाकृष्ण विखे पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

जामखेड,(प्रतिनिधी):- तालुक्यातील अरणगाव येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करण्यासाठी जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अरणगाव परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने विविध पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिकांची झालेली स्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी त्यांनी शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली. संबंधित यंत्रणेकडून पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री थेट बांधावर पोहोचल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!