नगरी समाचार,(प्रतिनिधी):- “भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजाला सुखी कर आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे,” अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
राज्यातील दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. राज्यातील सर्व विभागांची माहिती संकलित झाल्यानंतर टंचाई परिस्थितीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीगणेशाची पूजा करण्यात आली.
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक नसले तरी राज्यातील सर्व धरणे भरली आहेत. अल निनोच्या संकटाचे परिणाम आता प्रत्यक्षपणे जाणवू लागले असून पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे विघ्न दूर करण्यासाठी तसेच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विघ्नहर्त्याने शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील धरणांमध्ये पाणी उपलब्ध असले तरी २०२७ पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शेतीसाठी पाणी देणे आवश्यक असतानाच पिण्याच्या पाण्याला जलसंपदा विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. चारा पिकांसाठीही पाण्याची आवश्यकता भासणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही चिंताजनक परिस्थिती आहे. परतीचा पाऊस किती प्रमाणात होईल, याचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही. राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन मदत व पुनर्वसन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नैसर्गिक संकट लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका महायुती सरकारची आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या टंचाईबाबतही सरकार गंभीर असून मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य निर्णय घेतील, असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापूरे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कामगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









