केडगावमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लष्करी गुप्तचर विभाग आणि कोतवाली पोलिसांची संयुक्त कारवाई

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील दीपनगर परिसरात कथितरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभाग आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईनंतर एका महिलेसह दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील दीपनगर परिसरात महिलांना वेश्याव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर लष्करी गुप्तचर विभाग आणि कोतवाली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाईचे नियोजन केले.

त्यानंतर संबंधित ठिकाणी सापळा रचून अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये सैदा अफसर खान (वय ४५, रा. झेंडा चौक, केडगाव) आणि छोटूराम नारायण राजपूत (वय ७०, रा. केडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कोतवाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, कारवाईमुळे केडगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

error: Content is protected !!