नगरी समाचार,(प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने काठीने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याच्या पाठीला हात लावल्याच्या कारणावरून शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात शिक्षक संदीप कुंडलिक मचे यांच्याविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण कायद्यातील कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
रुद्राक्ष बापुराव सोनवणे हा विद्यार्थी जवखेडे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. गुरुवारी (दि. ११) सकाळी आईने त्याला शाळेत सोडले. दिवसभराचे शालेय कामकाज संपल्यानंतर सायंकाळी आई मुलाला घेण्यासाठी शाळेत पोहोचली. त्यावेळी रुद्राक्ष रडत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
आईने रडण्याचे कारण विचारले असता, वर्गातील एका विद्यार्थ्याच्या पाठीला हात लावल्याच्या कारणावरून शिक्षकाने काठीने मारहाण केल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मारहाणीमुळे विद्यार्थी घाबरल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर आईने त्याला घरी नेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाकडे याबाबत विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने विद्यार्थ्याच्या आईने हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर शुक्रवारी (दि. १२) आईने मुलाला सोबत घेऊन पाथर्डी पोलिस ठाणे गाठले आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षक संदीप कुंडलिक मचे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याला मारहाण झाल्याने त्याच्या शरीरावर इजा झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. ग्रामस्थांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाकडे घटनेबाबत विचारणा केली. तसेच या प्रकाराच्या निषेधार्थ शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली शारीरिक मारहाण करण्याचा प्रकार गंभीर मानला जातो. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो; त्यामुळे शिस्तीच्या नावाखाली काठीचा वापर करण्याऐवजी संयमाने व योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना समज देणे अपेक्षित आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक धोत्रे करीत आहेत. घटनेतील आरोप, संबंधित परिस्थिती आणि संपूर्ण वस्तुस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे. शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकावर कोणती कारवाई केली जाते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.









