अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- पावसाने ओढ दिल्याने यंदाच्या जलस्थितीबाबत चिंता वाढत असताना आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलनियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने बुधवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘एल निनो पाणीबाणी’ सामाजिक जलसतर्कता अभियानाची घोषणा करण्यात येणार आहे.
पिण्याचे पाणी, शेती, पशुधन आणि दैनंदिन वापरासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक थेंबाचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच जलसाठा, पर्जन्यमान आणि पाण्याच्या मागणीचा ताळमेळ साधून नियोजन करण्यावर संघटनांचा भर आहे.
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या समुद्रपृष्ठाच्या तापमानात होणारी असामान्य वाढ आणि त्यासोबत होणारे वातावरणीय बदल याला एल निनो म्हटले जाते. एल निनोचा भारतीय मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी त्याचा परिणाम प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक प्रदेशात समान असेलच असे नाही.
त्यामुळे केवळ एल निनोच्या अंदाजावर अवलंबून न राहता स्थानिक पर्जन्यमान, धरणांमधील जलसाठा, भूजलपातळी आणि प्रत्यक्ष पाण्याची मागणी यांचा विचार करून स्थानिक पातळीवर जलनियोजन करणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाने जलअंदाजपत्रक तयार करावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. गावातील धरणे, तलाव, विहिरी, बोअरवेल, भूजलसाठा तसेच उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि विविध क्षेत्रांची पाण्याची गरज यांचा सविस्तर हिशेब तयार करून तो नियमितपणे नागरिकांसमोर सार्वजनिक करावा, अशी भूमिका मांडण्यात येणार आहे.
पाणीटंचाईच्या काळात पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि पशुधन या अत्यावश्यक गरजांना प्रथम प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही सांगण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचे न्याय्य वाटप करण्यासाठी स्थानिक पातळीवर स्पष्ट आराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रातही ‘पाणी आहे म्हणून पीक’ याऐवजी ‘उपलब्ध पाण्यानुसार पीक’ या दृष्टिकोनातून नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात येणार आहे. जमिनीतील ओलावा, पिकांची पाण्याची गरज आणि उपलब्ध सिंचनसाठा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पीकनियोजनाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.
तसेच योग्य ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनाला प्रोत्साहन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात येणार आहे.
घरगुती वापरातील पाण्याचा अपव्यय रोखण्याबरोबरच शहर आणि गावातील सार्वजनिक नळ, जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांमधून होणारी गळती तातडीने थांबविण्याची गरज आहे. अनावश्यक धुलाई, वाहून जाणारे पाणी आणि पाण्याचा बेफाम वापर टाळून नागरिकांनी जलसंवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.
पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारणाची कामे वाढवणे, भूजल पुनर्भरण करणे तसेच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी पुनर्वापर करण्यावरही भर देण्यात येणार आहे. उद्योगांनी त्यांच्या पाणीवापराचे ऑडिट करून पाणी बचत आणि पुनर्वापराच्या उपाययोजना स्वीकाराव्यात, अशी भूमिकाही मांडण्यात येणार आहे.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून आधीच नियोजन करणे महत्त्वाचे आहे. प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शेतकरी, उद्योग आणि नागरिक यांनी एकत्रितपणे जलव्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारल्यास संभाव्य पाणी संकटाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्याकडून मांडण्यात येणार आहे.









