प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील पानोडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पावणे तीन लाख रुपयांची रोकड आणि सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनाथ कारभारी पाबळ यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. देवघराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नवनाथ कारभारी पाबळ यांच्या घरात चोरी केली. चोरट्यांनी प्रथम घरातील देवघराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेत पाबळ कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजात पावणे तीन लाख रुपयांच्या रोख रकमेसह तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अंगठी, कानातील वेल आणि सोन्याच्या पोतीचा समावेश आहे. एकूण सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड चोरीला गेल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
घरफोडीची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी घरात प्रवेश कसा केला, चोरीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि चोरीचा मुद्देमाल कुठे नेण्यात आला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाई, वीजपुरवठ्याची अनिश्चितता आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक आधीच चिंतेत आहेत. त्यातच घरफोडी आणि चोरीच्या घटनांची भर पडल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रात्रीच्या वेळी घरांची आणि परिसराची सुरक्षा कशी राखायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. आश्वी परिसरातील या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या घरफोडीतील आरोपींचा शोध घेऊन चोरीला गेलेली रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









