प्रवरा सांस्कृतिक महोत्सवातून अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा जागर

लोणी,(प्रतिनिधी):- प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच समाजप्रबोधन, संस्कृती संवर्धन आणि नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. याच परंपरेत यंदाच्या प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याला केंद्रस्थानी ठेवून विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. देखावे, नाटिका, पोवाडे, पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविली.

शंभरहून अधिक शाळा-महाविद्यालयांत साकारले ऐतिहासिक देखावे

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट’ ही मध्यवर्ती संकल्पना घेण्यात आली. प्रवरा परिसरातील शंभरहून अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित आकर्षक आणि माहितीपूर्ण देखावे साकारले.

या देखाव्यांमध्ये अहिल्यादेवींचे बालपण, संस्कार, विवाहानंतरचा जीवनप्रवास, राज्यकारभार, लोककल्याणकारी कार्य, महिला सन्मान, धार्मिक व सामाजिक समन्वय, मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट-विहिरी-बांधकामे तसेच जलव्यवस्थापन अशा विविध पैलूंची माहिती देण्यात आली. त्या काळातील माहेश्वरी साड्या, तांब्या-पितळेच्या वस्तू, पारंपरिक दिवे, लाकडी वस्तू आणि इतर साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वातावरण उभे केले.

नाटिका, पोवाडे आणि पथनाट्यातून अहिल्यादेवींचा      जीवनप्रवास

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवातही अहिल्यादेवींच्या जीवनकार्याला विशेष स्थान देण्यात आले. ‘अहिल्या’ या संकल्पनेवर आधारित नाटिका, पोवाडे, पथनाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास रसिकांसमोर सादर करण्यात आला.यामुळे इतिहास हा केवळ पुस्तकातील विषय न राहता कला, संस्कृती आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा भाग बनला. तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा विविध कलामाध्यमांतून नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

 ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडीला ऐतिहासिक संदर्भ

जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रातील अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडी आयोजित करण्यात आली. चोंडी ते इंदूर या अहिल्यादेवींच्या जीवनप्रवासाशी संबंधित स्थळांना या उपक्रमातून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ जोडण्यात आला.याच उपक्रमाची पुढची पायरी म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने गणेशोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा व्यापक जागर केला.

इतिहासातून सामाजिक मूल्यांची जडणघडण

जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात आले.

सर्वधर्मसमभाव, नारीशक्तीचा सन्मान, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था, समाजसेवा आणि संस्कृती संवर्धन या मूल्यांची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अहिल्या केवळ एका समाजाच्या नव्हे, तर जनतेच्या मनातील होत्या’, हा संदेश विविध कलाविष्कारांतून देण्यात आला.

अहिल्याबाई केवळ एका समाजाच्या नव्हत्या, त्या जनतेच्या मनातील ‘अहिल्या’ होत्या”

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नव्या पिढीला त्यांचा इतिहास आणि लोककल्याणकारी कार्य समजावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. अहिल्याबाई केवळ एका ठराविक समाजाच्या नव्हत्या, तर त्या जनतेच्या मनातील ‘अहिल्या’ होत्या. ‘आम्ही अहिल्येच्या लेकी आहोत’, हा सन्मान आपल्या मुलींना आणि महिलांना देता आला, याचा आम्हाला अभिमान आहे.”

error: Content is protected !!