संगमनेर,(प्रतिनिधी):- सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. संगमनेर तालुक्यातील एका अन्न प्रक्रिया उद्योगावर छापा टाकून प्रशासनाने सुमारे १५ लाख रुपये किमतीचा संशयास्पद धने आणि बडीशेपचा साठा जप्त केला आहे. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मेसर्स जगदंबा फूड प्रॉडक्ट्स या प्रतिष्ठानाची तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ९ हजार ५९६ किलोग्रॅम अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १५ लाख ५६६ रुपये आहे.
जप्त केलेल्या साठ्यामध्ये ५ हजार ९९८ किलोग्रॅम धने डाळीचा समावेश आहे. या साठ्याची किंमत ८ लाख ९९ हजार ७०० रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय ३ हजार ५९८ किलोग्रॅम बडीशेप जप्त करण्यात आली असून, तिची किंमत ६ लाख ८६६ रुपये आहे. हा दोन्ही प्रकारचा माल गुजरातमधील उंझा येथील डी. ए. पटेल या पुरवठादाराकडून मागवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित अन्नपदार्थांवर चुकीचे लेबलिंग असणे, ते निर्धारित गुणवत्तेचे नसणे किंवा आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता या कारणांवरून प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्कर्षांच्या आधारे संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त श्री. माने आणि सहायक आयुक्त (अन्न) एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी यू. आर. सूर्यवंशी आणि सहायक आयुक्त (अन्न) परिमंडळ-२, अहिल्यानगर येथील एस. एच. इंगळे यांच्या पथकाने तपासणी केली.
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत तपासणी मोहीम राबवली जात आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ, चुकीचे लेबलिंग आणि नियमबाह्य विक्री रोखण्यासाठी अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









