शिर्डी शहरात पाणी कपात लागू; शनिवारपासून ४० मिनिटेच पाणीपुरवठा

शिर्डी,(प्रतिनिधी):- अल निनोचा प्रभाव आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिर्डी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय शिर्डी नगरपरिषदेने घेतला आहे. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ पासून शहरातील नागरिकांना दररोज केवळ ४० मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

जलसंपदा विभागाच्या दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, अल निनोचा प्रभाव आणि दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान १० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्देशांनुसार शिर्डी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाणी साठवून ठेवताना तसेच दैनंदिन वापर करताना पाण्याची नासाडी होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. भविष्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!