नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नावलौकिक गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे आजही कायम आहे. संस्थेचे दीड लाखांहून अधिक माजी विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून, हीच संस्थेची मोठी उपलब्धी आहे. मातीशी एकरूप झालेल्या आणि संस्थेशी बांधिलकी जपणाऱ्या माणसांच्या समर्पित भावनेमुळेच ‘प्रवरा’चा विश्वास आणि वेगळेपण सिद्ध होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालकांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संचालक शांतीनाथ आहेर, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रवेश परीक्षेत गुणवत्तेने यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाटचालीकडे पाहताना शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे प्रतिबिंब महाविद्यालयाच्या प्रगतीत दिसून येते. शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रांत यश संपादन केले, हा संस्थेसाठी अभिमानाचा विषय आहे. संस्थेने गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध प्रयोग आणि उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे.
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींमुळे त्यांच्या यशोगाथा घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. देशातील तसेच परदेशातील विविध शहरांमध्ये आणि नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.
देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे संस्थेचे माजी विद्यार्थी गणेश निबे यांचा विशेष उल्लेख करताना विखे पाटील म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्राबरोबरच ‘निबे स्पेस’च्या माध्यमातून त्यांनी खासगी अंतराळ क्षेत्रातही वाटचाल सुरू केली आहे. त्यांचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
प्रवरा परिवारात सध्या सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या परिसरात निर्माण झालेल्या शैक्षणिक वातावरणामुळे साक्षरतेचे प्रमाणही वाढले आहे. चार किलोमीटरच्या परिसरात हायस्कूल आणि सहा किलोमीटर अंतरावर कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. प्रवरा संस्थेत प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी राहत नाही, तर तो प्रवरा परिवाराचा एक घटक बनतो, असेही त्यांनी सांगितले.
‘मीसुद्धा प्रवरेचा माजी विद्यार्थी’
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी आपण स्वतःही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याचे आवर्जून सांगितले. राज्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा १९६४ साली पद्मश्रींनी स्थापन केली होती आणि याच शाळेत आपले शिक्षण झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनीही पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण याच संस्थेत घेतले आहे. त्यामुळे संस्थेशी जोडलेल्या माणसांनी ती केवळ चालवली नाही, तर कमालीच्या आत्मीयतेने जोपासून वाढविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील व प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थिनी सलोनी पुलाटे, सायली बहिरट तसेच पालक प्रतिनिधी आशिष जाधव, भाग्यश्री देशमुख आणि प्रवेश समन्वयक अनिल लोंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.









