नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील कोल्हार शिवारात विनापरवाना शासकीय वाळूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध लोणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७,५०० रुपये किमतीची दीड ब्रास वाळू तसेच १ लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अहवालानुसार, ही कारवाई ९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.०७ वाजता करण्यात आली. आरोपी शुभम रावसाहेब होन (वय २३, रा. कडीत बु., ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा टाटा कंपनीच्या विटकरी रंगाच्या MH 04 DD 5492 क्रमांकाच्या टेम्पोमधून विनापरवाना शासकीय वाळू घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे दीड ब्रास वाळू आढळून आली. वाळूची अंदाजे किंमत ७,५०० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी केली.









