कोल्हार–लोणी मार्गावर तिहेरी धडक; मोठा अनर्थ टळला

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- कोल्हार–लोणी मार्गावरील खर्डे वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी दुधाचा टँकर, व्हॅगनआर आणि एक्सयूव्ही या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने बालकांसह सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मढी येथे दर्शन घेऊन संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅगनआरची संगमनेरहून दूध घेऊन राहुरीकडे निघालेल्या टँकरशी समोरासमोर धडक झाली. ही धडक होत असतानाच मागून येणारी एक्सयूव्ही अपघातग्रस्त वाहनांना धडकली. त्यामुळे काही क्षणांतच तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला.

धडकेचा जोर एवढा होता की दुधाच्या टँकरचा ताबा सुटला. टँकर रस्त्यापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या खर्डे वस्तीतील एका घराच्या तटबंदीवर जाऊन आदळला. टँकर घराजवळ पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

व्हॅगनआरमध्ये सात जण प्रवास करत होते. त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश होता. तसेच एक्सयूव्हीमध्येही कुटुंबासह एका बालकाचा प्रवास सुरू होता. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यामुळे काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.

या अपघातामुळे कोल्हार–लोणी मार्गावरील भरधाव वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!