नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांनी श्री साईबाबांच्या चरणी ५४ किलो ६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा नंदी व बेस, तसेच २२ कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदी श्रद्धापूर्वक अर्पण केली. या सोन्या-चांदीच्या दानाची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३४ लाख ४१ हजार ६२७ रुपये आहे. ही माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या नंदीची धार्मिक विधी व मंत्रोच्चारांसह भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
आग्रा येथील साईभक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या नंदीचे वजन २७ किलो २७ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २७ हजार २१ रुपये आहे. तर नंदीसाठी अर्पण केलेल्या चांदीच्या बेसचे वजन २७ किलो ३८ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २९ हजार ४७४ रुपये आहे. नंदी व बेसचे एकूण वजन ५४ किलो ६५ ग्रॅम, तर एकूण देणगीमूल्य १ कोटी २० लाख ५६ हजार ४९५ रुपये आहे.
या चांदीच्या नंदीला विशेष धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचे शिंग (शिंग कव्हर) आणि सोन्याची बिंदी अर्पण करण्यात आली आहे. सोन्याच्या शिंगाचे वजन ६९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम, तर बिंदीचे वजन २९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम आहे. या दोन्ही सोन्याच्या अलंकारांचे एकूण वजन ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम असून, त्यांचे देणगीमूल्य १३ लाख ८५ हजार १३२ रुपये आहे.
आग्रा येथील या साईभक्तांनी यापूर्वीही श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील सोन्या-चांदीच्या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या आहेत. श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून सातत्याने केले जाणारे त्यांचे योगदान साईभक्ती, समर्पण आणि सेवाभावाची समृद्ध परंपरा अधोरेखित करणारे आहे.
साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या अमूल्य दानातून श्री साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’ या संदेशाची अनुभूती अधिक दृढ होत असून, भक्ती, समर्पण आणि सेवाभावाची ही परंपरा अखंड सुरू असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.









