नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागासाठी सुमारे ४९ लाख रुपये किमतीचे ‘हाय स्पीड ड्रिल सिस्टीम फॉर न्यूरोसर्जरी’ हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण देणगीस्वरूपात प्राप्त झाले आहे. प्रिझ्मा ग्लोबल लिमिटेडच्या वतीने कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम अय्यर यांनी हे उपकरण श्री साईबाबा संस्थानला देणगीस्वरूपात प्रदान केले.
या अत्याधुनिक उपकरणाचे श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, न्यूरोसर्जन डॉ. संतोष उनवणे, डॉ. विश्वनाथ कामतगी, बायोमेडिकल इंजिनिअर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, कार्तिक पांगरकर, सहाय्यक अधीसेविका मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यूरोसर्जरी विभागात मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी हे अत्याधुनिक उपकरण उपयुक्त ठरणार आहे. या उपकरणाच्या उपलब्धतेमुळे शस्त्रक्रियांमध्ये अधिक अचूकता साधण्यास तसेच उपचार अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपकरण महत्त्वाचे ठरणार असून, न्यूरोसर्जरीच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.









