नगरी समाचार,(प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथील पालवे वस्तीवर पहाटेच्या सुमारास दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरात नेल्यानंतर पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू शंकर जायभाये (वय ४४, रा. पालवे वस्ती, तनपुरवाडी, ता. पाथर्डी) हे आपल्या पत्नीसह घरासमोरील पडवीत झोपले होते. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर दाम्पत्याला घरामध्ये नेऊन पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
पहाटेच्या वेळी घडलेल्या या धाडसी चोरीमुळे तनपुरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेत तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपासाची कार्यवाही सुरू केली.चोरीच्या या घटनेमागे नेमके कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहे.









