संगमनेर एमडी ड्रग्ज कारवाईवर प्रश्नचिन्ह; सीसीटीव्ही फुटेजसह चौकशीची मागणी

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंमली पदार्थविरोधी कारवाईच्या नावाखाली एका तरुणाला जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.३ सप्टेंबर रोजी संगमनेर बसस्थानक परिसरात पोलिसांनी कारवाई करून कासिफ असद कुरेशी (वय २७, रा. भारतनगर) याला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोन (एमडी) जप्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, कारवाईची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप कासिफच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कासिफला काही व्यक्तींनी व्यवसायाच्या निमित्ताने संगमनेर बसस्थानक परिसरात बोलावले होते. तो आपल्या मोपेडवरून तेथे पोहोचल्यानंतर काही काळ थांबला. त्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याची दुचाकी रस्त्यात अडवून तपासणी केली. त्या वेळी कोणताही अंमली पदार्थ आढळला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

यानंतर कासिफला पुन्हा चहाच्या टपरीजवळ नेण्यात आले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींशी त्याचा संवाद सुरू असताना काही हालचाली झाल्यानंतर पुन्हा त्याच्या मोपेडची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये एमडी सापडल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर कासिफने आपल्या वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यांच्या दाव्यानुसार, सायंकाळी ६.५७ ते ७.३१ या कालावधीतील सुमारे ३४ मिनिटांचे फुटेज उपलब्ध असून, या फुटेजमधून कारवाईपूर्वी आणि कारवाईदरम्यान नेमके काय घडले, हे स्पष्ट होऊ शकते.

कुटुंबीयांनी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजसह पेनड्राईव्ह आणि घटनाक्रमाची लेखी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज अधिकृतपणे ताब्यात घेऊन त्याची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या कारवाईत एमडीच्या जप्तीच्या प्रमाणाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. जप्तीचा पंचनामा, घटनास्थळावरील परिस्थिती, नमुने घेण्याची प्रक्रिया, एफएसएल अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज यांची एकत्रित पडताळणी झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते, अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडली आहे.

या संपूर्ण कारवाईत संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका काय होती, घटनास्थळी कोण कोण उपस्थित होते, दुचाकीची तपासणी कोणत्या पद्धतीने झाली आणि जप्तीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडली, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्याला तपासापासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

‘ड्रग्जमुक्त’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न

अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येविरोधात शासन आणि पोलीस प्रशासनाकडून विविध मोहिमा राबवल्या जात असताना पोलिसांच्या कारवाईवरच अशा प्रकारचे आरोप होणे गंभीर मानले जात आहे. एखाद्या निष्पाप व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात अडकवले गेले असल्यास तेवढेच गंभीर; आणि आरोप चुकीचे असल्यास संबंधित पोलिसांवरील संशय दूर करण्यासाठीही पारदर्शक चौकशी आवश्यक आहे.त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, पंचनामा, जप्तीची प्रक्रिया, साक्षीदारांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे तपासून या प्रकरणाची सत्यता समोर आणावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!