राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा ५ ऑक्टोबरपर्यंत आढावा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा अंदाज स्पष्ट होणार.

लोणी,(प्रतिनिधी):- राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून, सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा अंदाज समोर येईल. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित मदतीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्व मंत्री दौरे करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यामुळे परिस्थितीचे संपूर्ण चित्र समोर येण्यापूर्वी केवळ दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य नाही, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडे सध्या मुद्द्यांचाच दुष्काळ झाला असून, दुष्काळाचे माध्यम शोधून राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महायुती सरकार अतिशय संवेदनशीलतेने राज्यातील परिस्थितीला सामोरे जात असून, शेतकऱ्यांना मदत होईल असे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घेतील, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारची निश्चित कार्यपद्धती असून, त्यानुसारच निर्णय घेतले जातात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना या कार्यपद्धतीची पूर्ण माहिती आहे, कारण त्यांनीही मंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना चुकीच्या नाहीत; मात्र सरकारला ठरलेल्या प्रक्रियेनुसारच निर्णय घ्यावे लागतात, असे त्यांनी सांगितले.

एनडीआरएफ आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीसाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याच्या दृष्टीने सरकारकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, यंदाचा गळीत हंगामही आव्हानात्मक परिस्थितीतून जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावर्षी राज्यातील उसाचे क्षेत्र घटले असून, अनेक भागांत पुरेशा प्रमाणात ऊस लागवड झाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा कालावधीही आता सुमारे ८० दिवसांवर आला आहे. या सर्व अडचणी असतानाही यंदाचा गळीत हंगाम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!