नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; राधाकृष्ण विखे पाटलांनी केले स्वागत

स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून निवड; विखे पाटील कुटुंबासह लोणी ग्रामस्थांमध्ये आनंद

लोणी,(प्रतिनिधी):- महाराष्ट्राशी आणि विशेषतः अहिल्यानगरशी घट्ट नाते असलेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्यांची निवड झाली असून, या यशाचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. उपलब्ध वृत्तांनुसार नीला विखे पाटील या स्वीडनच्या ३४९ सदस्यीय रिक्सदाग संसदेत निवडून आल्या आहेत.

या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आमच्या कुटुंबातील एक सदस्य एवढ्या मोठ्या पदावर निवडून जाणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. या यशाचा आनंद आमच्या कुटुंबाबरोबरच संपूर्ण लोणी ग्रामस्थांनाही आहे. तिथल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत निला विखे पाटील यांनी दिलेल्या निरंतर योगदानाचेच हे मोठे यश आहे.”

माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, नीला विखे पाटील यांच्या निवडीचे वृत्त ऐकून परिवाराला मनस्वी आनंद झाला. सुरुवातीपासूनच त्यांनी स्वीडनमधील सामाजिक व राजकीय व्यवस्थेत सक्रिय राहून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये विखे पाटील कुटुंबाच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्याचा प्रभावही दिसून येतो.

नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्टॉकहोम नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले असून, स्वीडनच्या राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले असल्याचे वृत्त आहे.

बालकल्याण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही नीला विखे पाटील यांनी स्वीडनमध्ये काम केले आहे. या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांना संसदेत काम करण्यासाठी व्यापक पार्श्वभूमी मिळाली आहे.

“नीला विखे पाटील यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती त्यांच्या या ऐतिहासिक यशातून मिळाली आहे. स्वीडनमधील नागरिकांच्या अपेक्षा त्या पूर्ण करतील, यासाठी त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,” असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

नीला विखे पाटील यांच्या स्वीडनच्या संसदेत झालेल्या निवडीमुळे अहिल्यानगर आणि महाराष्ट्राशी संबंधित कुटुंबाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय उपस्थिती अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!