आश्वी बुद्रुक येथे संगम गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव

बाळासाहेब ब्रास बँड व देवांश डेकोरेटर्स प्रमुख आकर्षण

आश्वी,(प्रतिनिधी):- आश्वी बुद्रुक येथील संगम गणेश मित्र मंडळ व शिवछत्रपती युवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही गणेशोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव, रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आश्वी-निमगावजाळी रोडलगत पाटावर होणाऱ्या या धार्मिक व सामाजिक उपक्रमात गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ज्ञानामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध कीर्तनकारांच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ह.भ.प. गौरीताई अस्वले (बाल कीर्तनकार), भरत महाराज आरोटे (आळंदी देवाची), ज्ञानेश्वर दासजी महाराज (कानळद), अर्जुन महाराज चौधरी (नादुर्खी), बाबासाहेब महाराज मगर (चिंचपूरकर), ओंकार महाराज चाटे (आळंदी देवाची), वैभव महाराज काळे (नेवासा), संतोष महाराज गोरे (संभाजीनगर) तसेच सुनिल महाराज पवार (आश्वी खुर्द) यांची कीर्तने होणार आहेत.

याशिवाय २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण बाळासाहेब ब्रास बँड, निफाड आणि देवांश डेकोरेटर्स असणार आहेत. गणेशोत्सवासाठी मंडप, सजावट, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, प्रसाद तसेच अन्य आवश्यक सुविधांसाठी विविध मान्यवर, ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभले आहे.

महोत्सवासाठी कीर्तनाचे सौजन्य देणारे तसेच अन्नदानासाठी योगदान देणाऱ्या सर्व अन्नदात्यांचे संगम गणेश मित्र मंडळाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे हा धार्मिक व सामाजिक उपक्रम अधिक उत्साहात पार पडत असल्याचे मंडळाने सांगितले.

गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कीर्तन महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संगम गणेश मित्र मंडळ व शिवछत्रपती युवा प्रतिष्ठाण, आश्वी बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!