संगमनेर,(प्रतिनिधी):- अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने संगमनेर तालुक्यात कारवाई करत 2 लाख 60 हजार 820 रुपये किंमतीचा ‘काऊ घी’चा साठा जप्त केला आहे. कमी दर्जाचा असल्याचा संशय आल्याने या अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच नियम व नियमन, 2011 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी यांच्या पथकाने 21 सप्टेंबर 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील मे. व्ही. एस. एकदंत फुड प्रॉडक्ट्स या आस्थापनेची अचानक तपासणी केली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे अनुपालन होत नसल्याचे तसेच अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत संशय आढळून आला. त्यानंतर ‘काऊ घी (जार)’ आणि ‘काऊ घी (15 किलो टिन)’ या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आणि संबंधित साठा जप्त करण्यात आला.
2.60 लाखांचा साठा जप्त
कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये:
काऊ घी (जार) – 176 लिटर, म्हणजेच 1 लिटरचे 176 जार; किंमत 1 लाख 35 हजार 520 रुपयेकाऊ घी (15 किलो टिन) – 179 किलो, म्हणजेच 15 किलोचे 12 टिन; किंमत 1 लाख 25 हजार 300 रुपये असा एकूण 2 लाख 60 हजार 820 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई
जप्त साठ्यातून घेण्यात आलेले अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी हे सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित
दरम्यान, आष्टी, जि. बीड येथील दूध भेसळ प्रकरणात सहभाग आढळून आल्याने मे. भगवान कृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र, खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या आस्थापनेचे मालक हरिदास एकनाथ गोपाळघरे असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन
सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील स्वीटमार्ट तसेच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी कमी दर्जाचे अथवा अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्नपदार्थ तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणे टाळावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
तसेच बाहेरील राज्यांतून कमी दर्जाचे अन्नपदार्थ ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहनांमधून अस्वच्छ पद्धतीने वाहतूक करून जिल्ह्यात आणू नयेत. अशा प्रकार आढळल्यास संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीविरुद्धही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात अन्नपदार्थांच्या भेसळीबाबत संशय किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ-2, सो. ह. इंगळे यांनी केले आहे.








