लातूर,(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडत भावनिक आवाहन केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर पाण्याअभावी शेतीची झालेली अवस्था, आर्थिक अडचणी आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटाची माहिती दिली.
“शेतीला पाणी नाही, आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे,” अशी भावना संबंधित शेतकऱ्याने व्यक्त केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.यावेळी शेतकऱ्याने आपल्या व्यथा मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर फोडलेला टाहो उपस्थितांचे लक्ष वेधून घेतला. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करत सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
“लातूरमधील दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर फोडलेला टाहो कोणत्याही संवेदनशील माणसाला आतून हलवणारा आहे,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.








