अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती संतोष परसराम पटोरकर (वय ३२, रा. बिबामल, ता. धारणी, जि. अमरावती) याला भा.न्या.सं. कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा निकाल दिला.
सरकार पक्षाच्या माहितीनुसार, आरोपी संतोष पटोरकर हा त्याची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी यांच्यासह अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील ब्रिज इंडस्ट्रीज कंपनी येथे मुक्कामासाठी आला होता. ३ एप्रिल २०२१ रोजी रात्री जेवण केल्यानंतर आरोपी, त्याची पत्नी व मुलगी कंपनीच्या सुरक्षा कॅबिनमध्ये झोपले होते.
रात्रीच्या वेळी कॅबिनमध्ये अन्य कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याच साडीने गळा आवळून तिची हत्या केली, असा आरोप सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अनिता कुलट, सुमन काळापाड, गणेश तुकाराम काळोखे, कंपनीचे मालक सागर ब्रिजमोहन बक्षी, सहायक फौजदार मोहम्मद उमराव शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद लक्ष्मण सायगावकर तसेच घटनास्थळ पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज अरविंद आठरे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजसह सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा आणि करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश वसंतराव दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी आणि मपोकॉ/२४१४ एस. के. गुंजाळ यांनी सहकार्य केले.








