शिक्षक मैदानात उतरले तर विद्यार्थीही मैदानात उतरतील – ना.विखे पाटील

खेळातून आरोग्य, शिस्त आणि संघभावनेचा संदेश

लोणी,(प्रतिनिधी):- मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते. शिक्षक स्वतः मैदानात उतरून खेळले तर विद्यार्थीही निश्चितपणे खेळांकडे वळतील आणि प्रवरेची क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित प्रवरा क्रीडा महोत्सव २०२६ च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संरक्षण क्षेत्रातील उद्योजक गणेश निबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्यासह अधिकारी, शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि सेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा या निरोगी जीवनशैली घडविणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रम आहेत. खेळाच्या माध्यमातून निर्माण होणारी संघटितपणे काम करण्याची वृत्ती भविष्यात प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्यास उपयुक्त ठरते.

भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असून या क्षेत्रात प्रवरेचे भूमिपुत्र गणेश निबे यांनी केलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगताना त्यांनी प्रवरेचा विद्यार्थी आज जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबत क्रीडा, संशोधन आणि रोजगाराभिमुख उपक्रमांना दिले जात असलेले प्राधान्यही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी उद्योजक गणेश निबे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, प्रवरेच्या भूमीने ज्ञान, संस्कार आणि सन्मान दिल्यामुळेच जागतिक स्तरावर कार्य करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा संकल्प अधिक बळकट झाला असून भविष्यात गुणवंत विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना निबे उद्योग समूहाच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेटसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील महाविद्यालयीन तसेच सेवकांच्या विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धांचे नियोजन संस्थेच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. उत्तमराव अनाप, डॉ. रमेश दळे आणि क्रीडा शिक्षकांच्या पथकाने केले.

Leave a Comment

error: Content is protected !!