श्रीरामपूर,(प्रतिनिधी):- तालुक्यातील फत्याबाद गावातील स्मशानभूमीत सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधवी नामदेव पलघडमल या फत्याबाद ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फत्याबाद गावातील स्मशानभूमीत मुरुमाचा भराव टाकण्याचे शासकीय काम सुरू होते. या कामाच्या संदर्भात आरोपीने फिर्यादीशी फोनवर संपर्क साधून १ लाख रुपयांची मागणी केली होती.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पैसे न दिल्यास काम करू देणार नाही, विविध प्रकरणांत अडकवून नोकरी घालवून देईन तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १४ सप्टेंबर रोजी फोन-पेच्या माध्यमातून १,१०० रुपये जबरदस्तीने घेतल्याचे फिर्यादीने सांगितले.
दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून फत्याबाद येथील स्मशानभूमीत आला. त्यावेळी शासकीय काम सुरू असताना त्याने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले.तसेच आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जात तिला जोराचा धक्का देऊन खाली पाडले आणि तिच्यासोबत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकारामुळे स्मशानभूमीतील सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.कामाच्या ठिकाणाहून निघून जाताना आरोपीने पैसे न दिल्यास फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चांडेवाडी (ता. श्रीरामपूर) येथील दत्तात्रय पोपट खेमनर याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 492/2026 अन्वये BNS कलम 308(5), 132, 115(2), 352, 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची नोंद २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री करण्यात आला. सदर आरोपीस अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करत आहे. लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरची कारवाई केली.








