लोणी,(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणी उपलब्धता, सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने याबाबत यावेळी विचारविनिमय करून राज्यातील जलसंपत्तीचा प्रभावी वापर करून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांना अधिक गती देण्याच्या दृष्टीनेही यावेळी सविस्तर चर्चा झाली. नदीजोड प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, तसेच राज्यातील सिंचन व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचा अपेक्षित लाभ शेतकरी आणि नागरिकांना मिळावा, याबाबत केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असे सांगितले.
महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नदीजोड, सिंचनवाढ आणि जलसाठ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांना महत्त्व आहे. केंद्र सरकारकडून विविध जलप्रकल्पांना मिळणारे सहकार्य आणि आर्थिक पाठबळ यामुळे राज्यातील जलसुरक्षेला बळकटी देण्याचा प्रयत्न असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगण्यात आले.








