बिबट्याचा पाथरे-कोल्हार रस्त्यावर दांपत्यावर हल्ला; महिला जखमी

प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील शिरसाठ दांपत्यावर पाथरे-कोल्हार रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सौ. निकिता जगदीश शिरसाठ यांच्या पायाला बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या. मात्र, प्रसंगावधान राखल्याने जगदीश शिरसाठ आणि त्यांच्या पत्नी निकिता हे दोघेही या जीवघेण्या प्रसंगातून बालंबाल बचावले. या घटनेमुळे पाथरे बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथरे बुद्रुक येथील जगदीश दत्तात्रय शिरसाठ हे पत्नी निकिता यांच्यासोबत काही कामानिमित्त रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून कोल्हारच्या दिशेने जात होते. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाथरे-कोल्हार रस्त्यावरील खडके पाटोळे-शिंदे वस्ती परिसरात त्यांच्या मोटारसायकलच्या प्रकाशात रस्त्यावर दोन लहान पिल्ले दिसली. ही सशाची पिल्ले असावीत, असा समज झाल्याने ते त्यांच्याजवळ गेले. मात्र, याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या मोटारसायकलवर हल्ला केला. या हल्ल्यात निकिता शिरसाठ यांच्या पायाला बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दांपत्याची तारांबळ उडाली; मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी तेथून सुरक्षितपणे निघण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांनी शिरसाठ कुटुंबीयांशी संपर्क साधून जखमी निकिता यांना तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. या घटनेची माहिती अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ आणि कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना देण्यात आली.

माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख, मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के आणि वनरक्षक प्रतीक गजेवर यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. जखमी निकिता शिरसाठ यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्लाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी परिसरात आणखी एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली. मात्र, स्थानिक नागरिकांकडे चौकशी करूनही संबंधित व्यक्तीचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या माहितीची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.

दरम्यान, सध्या नवरात्रोत्सव सुरू असून कोल्हार-भगवतीपूर येथील भगवतीदेवी मंदिर तसेच पाथरे बुद्रुक येथील रेणुका माता मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी अनेक भाविक या मार्गावरून पायी प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्यालगत बिबट्याचे वास्तव्य असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यातच बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कडू, टिंकल कडू, आशिष शिंदे, बाबासाहेब शिरसाठ, दत्तात्रय शिरसाठ, नवनाथ शिरसाठ आणि बापू शिरसाठ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावण्यासह बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेषतः नवरात्रोत्सवासाठी रात्री आणि पहाटे प्रवास करणाऱ्या भाविकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!