श्रीरामपूर,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर फाडून विटंबना केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीत या दोघांचा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर फाडण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झाले होते. घटनेनंतर संबंधित संशयित कोल्हार येथून श्रीरामपूर शहराच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आदित्य शिवाजी गवारे (वय १९, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि गौरव सोमनाथ वडीतके (वय २२, रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) अशी आहेत.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दोघांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हार येथे बॅनर फाडण्यामागील नेमका हेतू काय होता आणि हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, बाळासाहेब कोळपे, संदीप दांदले, पोलीस कॉन्स्टेबल संपत बंडे, भारत तमनर, आकाश वाघमारे, जालिंदर माने, रोहित डोंगे, नंदू लोखंडे आणि होमगार्ड समीर शेख यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे करीत आहेत.









