लोणी,(प्रतिनिधी):- नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि त्याग यांचा प्रत्यय देणाऱ्या दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पार पडल्या. एका धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला, तर एका वडिलांनी आपल्या मुलाला किडनीदान करून नवजीवन दिले. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, चारही रुग्णांची प्रकृती समाधानकारक आहे. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, या दोन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि संबंधित वैद्यकीय सुविधा रुग्णालयामार्फत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.

पहिल्या शस्त्रक्रियेत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील गणेश अंकुश घुले (वय ३०) यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांच्या किडनीच्या आजारावर मात करण्यासाठी धाकटे भाऊ संतोष अंकुश घुले यांनी स्वखुशीने किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. भावाच्या आरोग्यासाठी आणि त्याला पुन्हा सामान्य जीवन जगता यावे, यासाठी संतोष यांनी केलेला त्याग कुटुंबीयांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला आहे.
दुसऱ्या शस्त्रक्रियेत भिंगार येथील मोहम्मद अख्तर (वय ४८) यांनी आपल्या २२ वर्षीय मुलगा मोहम्मद अफजल याला किडनीदान केले. मुलाच्या आरोग्यासाठी आणि त्याला नवजीवन मिळावे यासाठी वडिलांनी घेतलेला हा निर्णय पालकांच्या निस्सीम प्रेमाचे दर्शन घडवणारा ठरला. या दोन्ही कुटुंबांसाठी प्रत्यारोपणाच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी रुग्णालयामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांतील रुग्णांनाही या रुग्णालयाचा लाभ मिळत आहे.
किडनी प्रत्यारोपणासारख्या खर्चिक आणि गुंतागुंतीच्या उपचारांची सुविधा विनामूल्य उपलब्ध झाल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गरजू रुग्णांना नवजीवन देण्यासाठी अवयवदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रुग्णालयाचे प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. एन. एस. पवार, डॉ. जोर्वेकर, डॉ. तुषार भवर, डॉ. एस. एल. तुंगीकर आणि डॉ. काजल दरंदले यांच्यासह वैद्यकीय पथकाने सहभाग घेतला. अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या संपूर्ण पथकाच्या समन्वयातून या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले.
प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील या यशस्वी किडनी प्रत्यारोपणामुळे वैद्यकीय सेवेबरोबरच नात्यातील प्रेम, त्याग आणि अवयवदानातून मिळणाऱ्या नवजीवनाचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.









