लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील गोगलगाव परिसरात सादतपूर ते लोणी सबस्टेशनदरम्यान नवीन ११ केव्ही वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना वीजवाहिनीची ॲल्युमिनियमची तार आणि पिन इन्सुलेटर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भाऊसाहेब सांगळे (वय ३२, रा. पिंपरी लौकी, ता. संगमनेर) हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. ते साईलाईट अँड सर्व्हिसेस या कंपनीचे प्रोप्रायटर असून, त्यांच्या कंपनीमार्फत सादतपूर ते लोणी सबस्टेशनदरम्यान रस्त्याच्या कडेला नवीन ११ केव्ही वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी ॲल्युमिनियमची तार आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणी नेण्यात येत होती. तसेच, कामाच्या देखरेखीसाठी मजूरही नियुक्त करण्यात आले होते.
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणेश सांगळे आणि एनसीसीचे सुपरवायझर अभिषेक सावंत हे टाकण्यात आलेल्या वीजवाहिनीची पाहणी करत होते. त्यावेळी गोगलगाव येथील राज मोटार परिसरात वीजवाहिनीचे सहा गाळे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर काशिनाथ नायक यांना घटनेची माहिती दिली. संबंधित परिसरात तसेच आजूबाजूला चोरीला गेलेल्या तारेचा शोध घेण्यात आला; मात्र तार आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने वीजवाहिनीची तार चोरी झाल्याचे लक्षात आले.
या चोरीमध्ये अंदाजे ५० हजार रुपये किमतीची १०० चौरस मिलिमीटर क्षमतेची ट्रिपल एसी ॲल्युमिनियम कंडक्टरची सहा गाळ्यांतील सुमारे ९५० मीटर लांबीची तार, तसेच प्रत्येकी २०० रुपये किमतीचे ११ केव्हीचे १८ पिन इन्सुलेटर, असा एकूण ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
याप्रकरणी गणेश सांगळे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश धादवड करत आहे.









