झरेकाठी,प्रतिनिधी(सोमनाथ डोळे):- दुष्काळाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आधार देणारा दुग्ध व्यवसायही अडचणीत सापडला आहे. पावसाने दडी मारल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात या दुष्काळाचा दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

झरेकाठी परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रांवर पाठविले जाते. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. घास, गिनी गवत यांसारख्या चारा पिकांची उपलब्धता कमी झाल्याने पशुपालकांसमोर जनावरांचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पेंड आणि इतर पूरक पशुखाद्याच्या किमती वाढल्याने जनावरांच्या संगोपनासाठी होणारा खर्चही वाढला आहे.
दुष्काळाचा फटका केवळ दुग्ध व्यवसायालाच बसलेला नाही, तर खरीप हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी सोयाबीन, मका यांसारख्या पिकांसह कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे उत्पादन संकटात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतीला आर्थिक आधार देणारा दुग्ध व्यवसायदेखील संकटात सापडल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.
जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दूध उत्पादनात आणखी घट होण्याची भीती दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळत नसल्याने त्यांची काळजी घेणे कठीण झाले आहे. जनावरांच्या पालनपोषणाचा खर्च वाढत असतानाच दुष्काळामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही परिणाम होत आहे. चारा-पाण्याची व्यवस्था करणे अशक्य झाल्यास काही पशुपालकांवर वर्षानुवर्षे सांभाळलेल्या गाई-म्हशी विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मात्र, अशा परिस्थितीत जनावरे खरेदी करण्यासाठीही अपेक्षित मागणी नसल्याने पशुपालकांची अडचण वाढली आहे.
दुग्ध व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जनावरांचा चारा, पशुखाद्य आणि इतर खर्च भागविला जातो. मात्र, सध्या खर्च वाढत असून जनावरांचे संगोपन करणे दिवसेंदिवस जिकिरीचे बनत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या पशुपालकांना तातडीने मदतीची गरज आहे.
शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन झरेकाठी परिसरासह दुष्काळग्रस्त भागांत तातडीने चारा डेपो आणि चारा छावण्या सुरू कराव्यात. जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दुग्ध व्यावसायिकांकडून होत आहे. अन्यथा, चारा-पाण्याअभावी पशुधन जगविणे कठीण होऊन दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.









