वाकोडीत खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; कॅम्प पोलिसांकडून दोघांना अटक

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी शिवारात एका व्यक्तीचा खून झाल्याच्या प्रकरणाचा कॅम्प पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात रोहित दिलीप भोसले आणि अंबर दिलीप भोसले या दोघांना पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी वाकोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ खून झाल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त झाली. त्यानंतर कॅम्प पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी दिलीप करमदास भोसले (वय ४२, रा. वाकोडी शिवार, ता. जि. अहिल्यानगर) हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या कानातून रक्त येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच घटनास्थळी आढळलेल्या संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणात मृताच्या पत्नीने तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल बिभीषण काशिनाथ दिवटे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत २५ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना कॅम्प पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. वाकोडी शिवारातील हरिभाऊ कर्डिले यांच्या शेतात राहणाऱ्या रोहित दिलीप भोसले याचा शोध घेत असताना तो बुरुडगाव रोड परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, दिलीप भोसले हे दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत आणि या कारणावरून पत्नीला वारंवार मारहाण व शिवीगाळ करत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याच कारणावरून रोहित दिलीप भोसले आणि अंबर दिलीप भोसले यांनी दिलीप भोसले यांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन भेटे आणि पोलीस कॉन्स्टेबल महादेव पवार करीत आहेत.

error: Content is protected !!