साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय : दुष्काळ निवारणासाठी ५ कोटींचे योगदान

शिर्डी,(प्रतिनिधी):- राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना आर्थिक हातभार लावण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. या योगदानाचा धनादेश श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना बळ देण्यासाठी संस्थानच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे. या आर्थिक योगदानामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये मदतकार्य राबविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हातभार लागणार आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत संस्थानकडून विविध सेवाभावी उपक्रमांनाही सहकार्य केले जाते. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांच्या काळात समाजाच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची संस्थानची परंपरा या योगदानातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेले ५ कोटी रुपयांचे योगदान हे राज्यातील संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

error: Content is protected !!