प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या सानिका डोंबाळे, श्रावणी आमटे यांची महाराष्ट्र हॉकी संघात निवड

लोणी,(प्रतिनिधी):- राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. सानिका डोंबाळे आणि कु. श्रावणी आमटे या दोघींची १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत सानिका डोंबाळे आणि श्रावणी आमटे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मैदानावरील कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. आगामी डिसेंबर महिन्यात पंजाब राज्यातील लुधियाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेत या दोन्ही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या खेळाडूंना विद्यालयाच्या प्राचार्या विद्याताई घोरपडे, सौ. कल्पना कडू, कु. श्वेता पाटील तसेच फुटबॉल प्रशिक्षक कु. स्नेहल सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!